भारतीय कामगार सेना : स्थापना व उद्दीष्टे

’कामगार चळवळीत शिवसेना पाऊल का टाकत आहे” याचे उत्तर देताना शिवसेनाप्रमुखांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, “पक्षीय राजकारण्यांनी राजकीय मतलबासाठी कामगार संघटनांचा हुकमी हत्यार म्हणून चालवलेला उद्योग शिवसेना बंद पाडू इच्छिते. जळात राहून माशाशी वैर करण्यासारखा हा प्रयोग असला तरी कामगारवर्गाच्या एकमेव हितासाठी तेवढं धारिष्ट्य करण्याची शिवसेनेची ताकद आहे. ज्यांचे हात स्वच्छ असतात, हेतू निर्मळ आणि निभेंळ लोकहितवादी असतात, त्यांनी जगात कोणालाही नि कशालाही भिण्याचं कारण नाही. शेतकरी, कामगार, मजूर आमच्याच हाडामांसारक्ताचे भाईबंद आहेत. त्यांना आम्ही ओळखतो, ते आम्हाला ओळखतात. परस्परांतल्या प्रेमाचा नि विश्‍वासाचा दुवा साधण्यासाठी परकियांच्या हस्तक्षेपाची किंवा नेत्रसंकेताची जरुर ती काय, मालक-मजूर, मजूरांतही पुन्हा बुद्धिजीवी नि श्रमजीवी असल्या भिंती उभारून मराठी कामगाराला दुबळा केला जात आहे, याची जाणीव त्याची त्याला होत नसावी असे समजण्याचे कारण नाही. जोड्यातला खडा कुठे टुपतो आणि तो खडा कसल्या मालमसाल्याचा आहे हे प्रत्येक कामगार हे पूरेपूर जाणून आहे. नागरी जीवनात अशांततेचा नि असंतोषाचा वणवा धगधगता ठेवण्यासाठी पक्षीय राजकारण्यांनी माकडाच्या तागडीसारखा आजवर आपला उपयोग करून घेतला याची जाणीव कामगारांना पूरेपूर झाली आहे. शिवसेना राजकीय सत्तेसाठी हापापलेली नाही. स्वावलंबनाच्या जोरावर महाराष्ट्राच्या सर्व थरांतील भगिनीबांधवांनी आपला सामाजिक, आर्थिक आणि नैतिक उत्कर्षाचा मार्ग ‘एकामेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ या राज्यरस्त्याने वाटचाल करावी, ही शिवसेनेची दुर्दम्य महत्त्वकांक्षा आहे." कामगार सेनेची स्थापना करण्याचा उद्देश यातून स्पष्ट झाला आहे.

 

९ ऑगस्टला सायंकाळी नरेपार्कवर भरलेल्या सभेत हजारो तरूण श्रोत्यांच्या साक्षीने शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेचा चक्रांकित भगवा ध्वज फडकविल्यानंतर केलेल्या भाषणात बाळासाहेबांनी या विषयीची आपली भूमिका अधिक स्पष्ट केली. ते म्हणाले की, “सध्याच्या ट्रेड युनियन नेत्यांनी कामगारांची वर्गणी स्वत:च्या खिशात कोंबून कामगारांना मात्र ऐनवेळी वार्‍यावर सोडण्याचा धंदा चालवला आहे. शिवसेनेची भारतीय कामगार सेना ‘ट्रेड युनियनिझम’ हा आपला धर्म मानील. अत्यंत प्रामाणिकपणे काम करील. युनियनवर आपल्या पक्षाच राजकारण लादणं आणि पक्षाचा जोर कमी झाला की ‘मुंबई बंद’ ची घोषणा करणं हाही आजच्या ट्रेड युनियनवाल्यांचा धंदा आहे. तो ही आम्हाला पसंत नाही. युनियनच काम फक्त कामगारांसाठी चालंल पाहिजे. राजकीय हेतूसाठी नि वर्गणीसाठी आम्ही कामगारांना कधीही राबवू देणार नाही. "

"‘जो मालक तो वाईट’ ही आमची भूमिका कदापी राहणार नाही. दिलदार आणि चांगल्या मालकाच्या, महाराष्ट्राशी तसंच कामगार हिताशी समरस झालेल्या मालकाच्या कारखान्यातील संप आम्हाला मंजूर नाही. आजवर आमची युनियन नव्हती, तरीही एकजूटीच्या ताकदीवर कामगार हितावर निखारे ठेवण्याचे संप आम्ही दांडगाईने ठोकरु. आता आमची रजिस्टर्ड युनियन आहे. मालक चांगला असेल तर नमस्कार, कामगारांना न्यायाने वागवाल तर शेकहॅण्ड आणि तस न झाल तर मग शेकवायच. पण राजकारणासाठी नि वर्गणी जमवून तुंबड्या भरण्यासाठी कामगारांना खड्ड‌यात लोटणारे लढे उगाच द्यायचे नाहीत."

 "आता ऐकतो की, वृत्तपत्र संपला पाठिंबा देण्यासाठी ‘मुंबई बंद’ करणार आहेत. आम्ही विरोध करू. कारण साखळी वृत्तपत्रवाले कधी आमच्या बाजूला आले होते, मुंबईत मराठी माणसाचं रणकंदन झाले तेव्हा ते आमच्या बाजूने का उभे राहिले नाहित, दणकेबाज पगार घेतात नि इतरत्र संप, लढे आदींना हटकून विरोध करताना! यावेळी या मंडळींना आम्ही टोला मारू. पुढे जर नीट वागले तर पुढच्या वेळी वेगळ धोरण ठेवता येईल."

शिवसेना प्रमुखांनी देशाला असणारा कम्युनिस्टांचा धोका पूर्णपणे ओळखला होता. मुंबईत कम्युनिस्ट प्रभावी ठरत होते. अशावेळी राजकीयदृष्ट्या त्यांना संपविणे आवश्यक असल्यामुळे ‘भारतीय कामगार सेना’ स्थापन करण्यात आली. मालक आणि कामगार या दोघांचे हितसंबंध साधणे हा कामगार सेनेचा मुख्य उद्देश. २९ डिसेंबरच्या ‘मार्मिक’ च्या पहिल्या पानावर बाळासाहेबांनी, “वज्रमुठीचा टोला देण्यासाठी आजच एक व्हा!" असा संदेश दिला. ते म्हणाले, “कामगार मैदान, होय, कामगार मैदान! याच ठिकाणी शिवसेनेच्या बहाद्दर सैनिकांनी लाल माकडांना धडा शिकवला. त्यांची मिरासदारी संपुष्टात आणली. तो वर्ष-दिन आज निराळ्या बेहोषीत तुम्हा-आम्हाला साजरा करायचाय. यावेळी नक्षलबारीवाले, माओची जी अवलाद या देशात लाल रक्ताचे पाट वहाण्याचे जे स्वप्‍न पाहत आहेत तिचा कायमचा बीमोड करण्यासाठी सार्‍यांनी एकीची वज्रमुठ आवळायची आहे. येथे पक्ष भेद नकोत, मतभेद नकोत, कही काही नको. भारतमातेचे कडवट देशनिष्ठ लेकरे म्हणून एक व्हायचे. मातेला संरक्षणाची हमी द्यायची. चला, पेटवा राष्ट्रभक्तीची चूड आणि लावा या भस्मासुराला. त्या आगीत सारे देशद्रोही जळून खाक होतील इतकी ती ज्वलंत, प्रखर असली पाहिजे."