वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे सर्वेसर्वा.... शिवसैनिकांचे दैवत...!!!
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे निष्ठावंत शिवसैनिकांचे दैवत !!!
ते महाराष्ट्राच्या जनतेचे, विशेषतः मुंबईच्या ‘मराठी माणसाचे’ आदर्श होते. त्यांना शिवसेनाप्रमुख ही उपाधी दिलेली असली तरी ह्या जगप्रसिद्ध नेत्याला स्वतःला व्यंगचित्रकार म्हणवून घेण्यात अभिमान वाटायचा. ते जागतिक कीर्तीचे,बुध्दिमान, प्रतिभावंत आणि अष्टपैलू व्यंगचित्रकार होते. त्यांची व्यंगचित्रे सामाजिक आणि राजकीय समस्यांना वाचा फोडणारी असत. बाळासाहेबांची व्यंगचित्रे मार्मिक, लक्ष्यावर अचूक वार करणारी, भेदक आणि मनाला भिडणारी असल्यामुळे वाचकांचे लक्ष वेधून घेत असत. त्याबरोबरच वाचकांना कोपरखळी मारुन आत्मपरिक्षण करण्यास भाग पाडणारी असत. साप्ताहिक ‘मार्मिक’ आणि दैनिक ‘सामना’मधील आग्रलेख आणि व्यंगचित्रांमुळे सामाजिक समस्या, अन्याय आणि राजकीय त्रृटी यांच्याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी सामान्य माणसाला एक सार्वजनिक व्यासपीठ मिळाले.
बाळासाहेबांनी दबल्या गेलेल्या,अत्याचार पिडित,उदासीन आणि त्रासलेल्या सामान्य जनतेला उत्साहित केले. त्यांनी सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या मजबूत सामर्थ्यशाली अशा शिवसेनेची स्थापना केली. शिवसेनेने फक्त महाराष्ट्रातच वादळ निर्माण केले असे नाही तर राजधानी दिल्लीतील राजकीय परिस्थितीदेखील हादरवली. ’मार्मिक’ हे शिवसेनेचे उगमस्थान होते.
वंदनीय बाळासाहेब ठाकरे सडेतोड आणि परखड पत्रकार, धाडसी लढवय्ये, निर्भिड वक्ते, आक्रमक आंदोलनकर्ते आणि जनसामान्यांचे नेते असे बहुआयामी अष्टपैलू व्यक्तिमत्व...!!!
व्यंगचित्रकार
जीवनामध्ये योग्यवेळेला योग्य गोष्टी घडणे, हे विधिलिखितच असते.प्रत्येक वेळी आपल्यावर नियती प्रभुत्व गाजवत असते.बाळासाहेबांनी व्यंगचित्रे काढायला सुरुवात केली तो काळ व्यंगचित्रांना पसंती असलेला, अतिशय भारलेला असा होता. व्यंगचित्रांचे एक वेगळे विश्वच निर्माण झाले होते.त्या व्यंगचित्रांच्या आणि हास्यचित्रांच्या विलक्षण जगात बाळासाहेबांनी स्वतःची अशी एक वेगळी शैली निर्माण केली होती.व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी लीलया स्वतःची अनोखी ओळख निर्माण केली होती. बाळासाहेब व्यंगचित्रकार आणि हास्यचित्रकार असल्यामुळेच त्यांच्या राजकारण आणि समाजकारणातील कारकीर्दीमध्ये ते उत्तुंग यशाच्या शिखरावर पोहोचू शकले असे त्यांच्या ‘फटकारे’ ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी नमुद केलेले आहे.
व्यंगचित्रे ह्या कलाप्रकाराने त्यांच्यावर मोहिनीच घातलेली होती.त्या भारलेल्या कालखंडातले बाळासाहेब हे अतिशय प्रतिभावंत, सिद्धहस्त आणि जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार होते.त्यांची व्यंगचित्रे अतिशय भेदक आणि अंतर्मुख करणारी असत. त्यांच्या ऐन बहराच्या काळात त्यांच्या लेखणीचा प्रभाव असा होता की वाचक मंत्रमुग्ध होत असत.
बाळासाहेब अतिशय नम्रपणे त्यांच्या यशाचे श्रेय त्यांचे आदरणीय पिता प्रबोधनकार ठाकरे ,चित्रकार बाबुराव पेंटर आणि इतर काही व्यक्तींना देतात.ह्या क्षेत्रात येण्याची खरी प्रेरणा त्यांना दुसऱ्या कोणाकडून नाही तर टाईम्स ॲाफ इंडियाचे त्यावेळचे प्रसिद्ध व्यंगचित्रकार बॅनबेरी ह्यांच्याकडून मिळाली.
फ्री प्रेस नियतकालिक
१९४६ साली, अगदी कोवळ्या वयात म्हणजे वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी बाळासाहेबांनी फ्री प्रेस नियतकालिकात व्यंगचित्रकार म्हणून काम सुरू केले. त्यावेळी बाळासाहेबांना अवघे पंचाहत्तर रुपये मानधन मिळत होते.१९४७ पर्यंत ते तिथे कायम स्वरुपी कर्मचारी सदस्य झाले. प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण अगोदरपासूनच फ्री प्रेस नियतकालिकामधे काम करीत होते.मात्र ,दोन वेळा बाळासाहेबांना तेथून राजीनामा द्यावा लागण्याजोगी परिस्थिती निर्माण झाली होती.
१९५२ मधे सर्वप्रथम त्यांनी राजीनामा दिला कारण त्यांना काम करण्यासाठी दिेलेली खोली टेलिफोन ॲापरेटरची खोली होती. तिथे चालू असलेल्या सततच्या बडबडीमुळे आणि गडबड गोंधळामुळे ते त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करु शकत नव्हते. बाळासाहेबांना त्या खोलीत एकाग्रतेने काम करणे शक्य होत नव्हते म्हणून त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर त्यांना कामासाठी दुसरीखोली देण्यात आली.
काही काळानंतर नियतकालिकाचे कार्यकारी मंडळ बदलले . बाळासाहेबांची व्यंगचित्रे प्रसिद्ध करण्यापूर्वी नायर नावाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तपासणीसाठी जात असत. नायर नव्यानेच बदलून आलेले होते. एकतर त्यांना व्यंगचित्रांमधले विशेष ज्ञान नव्हते, शिवाय मिनु मसानी आणि स. का. पाटील हे त्यांचे चांगले मित्र होते, त्यामुळे त्यांनी बाळासाहेबांना ह्या दोघांची व्यंगचित्रे काढू नयेत असा आदेश दिला. ह्यामुळे बाळासाहेब खूप नाराज झाले आणि त्यांनी राजीनामा दिला.
फ्री प्रेस दैनिक सोडल्यावर त्यांनी त्यांच्या एका दाक्षिणात्य मित्राबरोबर ‘न्यूज डे’ दैनिक सुरु केले पण ते बंद करावे लागले.ते बंद पडण्यापूर्वीच बाळासाहेब त्यातून बाहेर पडले होते कारण त्यांना हे लक्षात आले होते की आपल्या कल्पना त्या दैनिकात प्रत्यक्षात उतरवणे अवघड आहे.पैशाच्या बाबतीत फारच काटेकोर असल्यामुळे ते सहकाऱ्यांचा त्याबाबतीतला गोंधळ सहन करु शकले नाहीत.
‘न्यूज डे’ नंतर आणि ‘मार्मिक’ सुरु करण्याआधी बाळासाहेबांनी विविध नोकऱ्या केल्या.त्यांनी LIC साठी चित्रकार म्हणून काम केले,वाडिया मूव्हिटोनसाठी जाहिराती केल्या,पाठारे-पंडित स्टुडियोमध्ये कलाकार म्हणून काम केले,लिंटास जाहिरात संस्थेमध्ये काम केले.
‘भारतज्योती’,आचार्य अत्रे ह्यांचे ‘नवयुग’, लोकमान्य टिळकांचे ‘दैनिक केसरी’ ह्यांसारख्या प्रतिष्ठित वर्तमानपत्रांमधे त्यांची व्यंगचित्रे छापली गेली होती.बाळासाहेब स्थानिक ,राष्ट्रीय पातळीवर व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्ध होतेच पण ते आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील गौरविले गेले. जपानचे ‘ असाही शिंबुन’ आणि ‘न्युयार्क टाईम्स’ मध्ये त्यांची व्यंगचित्रे छापली गेली होती , ही बाळासाहेबांसाठी अतिशय अभिमानाची आणि सन्मानाची गोष्ट होती. विन्स्टन चर्चिल ह्यांच्या व्यंगचित्रात्मक चरित्रामध्ये बाळासाहेबांची तीन व्यंगचित्रे छापली गेली आहेत.लंडनमधील ‘डेली ॲाब्झर्व्हर’ वृत्तपत्राने त्यांना व्यंगचित्रकाराचे पद देऊ केले होते पण बाळासाहेबांचे पिता प्रबोधनकार ह्यांच्या आरोग्याच्या समस्येमुळे बाळासाहेबांनी ते नाकारले.
बाळासाहेबांनी काढलेली व्यंगचित्रे समकालीन व्यक्तींची ,तत्कालीन राजकीय, सामाजिक समस्यांविषयी होती तरी ती कालातीत आहेत. व्यंगचित्रकार म्हणून हेच बाळासाहेबांचे वेगळेपण आहे! ते एकमेवाद्वितीय आणि अभूतपूर्व व्यंगचित्रकार होते असेच म्हणावे लागेल.
सामान्य माणसाचा नेता
जिथे जिथे त्यांना अन्याय होताना दिसला तिथे तिथे बाळासाहेब त्याविरुद्ध लढले. न्याय्य हक्कांपासून वंचित केल्या गेलेल्या प्रत्येकाच्या पाठीशी ते कायमच ठामपणे उभे राहिले.त्यांना जातीय राजकारणाविषयी अतिशय तिरस्कार होता. त्यांनी शिवसेनेमधे कधीही जातपात, श्रीमंत- गरीब असे भेद येऊ दिले नाहीत. शिवसेनेने तळागाळातल्या जनतेला तिचे हक्क आणि अधिकार मिळवून दिले.सामान्य माणसांच्या समस्या सोडविण्यासाठी लढण्याला कायम प्राधान्य दिले.”मी एकटा नाहीये! शिवसेना आणि स्वतः बाळासाहेबदेखील कायम माझ्या पाठीशी ठाम उभे आहेत” ही श्रद्धा आणि विश्वास बाळासाहेबांनी सामान्य माणसांच्या मनात निर्माण केला होता.ते केवळ घोषणाबाजी करणारे नेते नव्हते .त्यांनी स्वतःच्या वागण्यातून शब्दांपेक्षा कृती जास्त बोलते हे सिद्ध केले होते.खऱ्या अर्थाने ते जनतेचे नेते होते.जनतेची दुःखे पाहून ते अतिशय व्यथित होत असत .ती दूर करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असत.बाळासाहेब कायम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दौऱ्यांवर जात असत.या भेटींच्या वेळी ग्रामीण भाग आणि तेथील लोकांची हलाखीची परिस्थिती पाहून त्यांच्या मनात अतिशय दुःख ,कणव आणि सहानुभुती दाटून येत असे.
निर्भिड वक्ता
शिवसेनेतर्फे शिवाजी पार्कवर दरवर्षी दसऱ्याचा सोहळा आयोजित केला जात असे. ह्या दसरा मेळाव्यामधे जमलेल्या विशाल जनसमुदायासमोर बाळासाहेब भाषण करीत. त्यांची भाषणे श्रोत्यांना अतिशय प्रेरणादायक आणि स्फूर्तीदायक असायची. बाळासाहेबांच्या ओघवत्या ,ओजस्वी वक्तृत्वातून त्यांचे विचार आणि कृती करण्याबाबतचा ठामपणा व्यक्त होत असे! ‘मार्मिक’, ‘सामना’ आणि शिवसेनेचे वर्धापनदिन म्हणजे प्रचंड मोठे मेळावे असायचे. त्यावेळी बाळासाहेब शिवसैनिकांना मार्गदर्शन करायचे.ही भाषणे अतिशय परखड आणि श्रोत्यांना विचार करायला प्रवृत्त करणारी असत.बाळासाहेब स्वतः व्यासंगी वाचक , सखोल निरीक्षक आणि महान वक्ते होते.
समाजविघातक गोष्टी,ढोंगीपणा,घृणास्पद वर्तन असणारे लोक ह्याचा त्यांना इतका तिटकारा होता की त्यांच्या भाषणांमधून ते कायम अशा लोकांवर घणाघाती टीका करीत असत.मराठी माणसासाठी ते अतिशय बाणेदारपणे लढले.त्यांच्याकडे जोशपूर्ण वक्तृत्वाने श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची आणि डोळ्यासमोर प्रसंग उभे करु शकण्याची ताकद होती.त्यांच्या वाणीच्या प्रभावामुळे गंभीर परिस्थितीतही घाबरुन न जाता येणाऱ्या आव्हानांना धैर्याने तोंड देण्यासाठी लोक सज्ज होत असत.
आघाडीचा सेनानी
बाळासाहेब जनतेचे नेते होते.सामान्य माणसाच्या समस्या आणि हलाखीच्या परिस्थितीमुळे ते अतिशय व्यथित होत असत. प्रबोधनकार ठाकरे त्यांना जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कायम प्रोत्साहन देत असत. बाळासाहेब एकदा म्हणाले होते,” डरकाळी फोडणारा वाघ व्हावं !नुसतं बेबे करणारी शेळी होऊ नये!” संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो किंवा मराठी माणसावरचा अन्याय दूर करण्यासाठीचा लढा असो,वा कोणतीही चळवळ , आंदोलन किंवा योजना असो; बाळासाहेब कायमच सामान्य माणसाचे रक्षणकर्ते असल्याचे अनुभवास आले आहे. बाळासाहेब कायम त्यांच्या संपूर्ण सामर्थ्यानिशी सामान्य माणसाच्या पाठीशी उभे राहिले.ते खरोखरच एक खंदे नेते आणि आघाडीचे सेनानी होते.
१९६९ मधील सीमा आंदोलन शिवसेनेच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहीलेले पान आहे. सीमाप्रश्न सोडवण्याबाबतचे निवेदन त्यावेळचे केंद्रीय गृहमंत्री मोरारजी देसाई ह्यांना देण्यासाठी आंदोलन करणारे शिवसैनिक वाट पहात थांबले होते. पण मोरारजींनी शिवसैनिकांकडे कानाडोळा केला आणि त्यांची गाडी न थांबता ,वाटेतील शिवसैनिकांना चिरडत निघून गेली.संतापलेल्या बाळासाहेबांनी शिवसैनिकांना माघार न घेण्याचा आदेश दिला आणि तत्काळ मुंबईभर वणव्यासारखे आंदोलन पसरले. बाळासाहेबांना अटक करण्यात आली.त्यावेळी त्यांना येरवडा तुरुंगात ७३ दिवस ठेवण्यात आले होते. त्यांचे तुरुंगातील अनुभव ‘गजाआडील दिवस’ ह्या पुस्तकात प्रसिद्ध झाले आहेत.


