भारतीय कामगार सेना : ध्येय व धोरणे

९ ऑगस्ट १९६८ रोजी नरे पार्क मैदानावरील सभेत शिवसेनाप्रमुख माननीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने कामगार विश्वातील एका वेगळ्या तत्त्वज्ञानाच्या श्वासाने भारलेली पहिली मराठमोळी तुतारी फुंकली गेली आणि मुंबईच्या आणि हिंदुस्थानच्या कामगार चळवळीत ‘भारतीय कामगार सेना’ नामक एका बलाढ्य देशप्रेमी कामगार संघटनेचा जन्म झाला. शिवसेनेचे कामगार धोरण व शिवसेनाप्रमुखांची मुख्य शिकवण खालीलप्रमाणे आहे.

  • कामगार हा राष्ट्रीय उत्पादनातील प्रमुख घटक आहे व म्हणून ज्वलंत राष्ट्रीय विचारसरणीचा तो प्रतीक आहे.
  • घटनेने बहाल केलेल्या मूलभूत अधिकारात त्याचे स्थान आहे.
  • हक्क व कर्तव्य ही एकाच नाण्याची दोन अंगे आहेत ही भूमिका कोणी नजरेआड करू शकणार नाही.
  • कामगारांची पिळवणूक, कोणत्याही प्रकारचे शोषण होणार नाही याची दक्षता घेणे.
  • उद्योगाची भरभराट व्हायलाच पाहिजे; तद्वत त्यातील योग्य मोबदला श्रमिकांना मिळाला पाहिजे.
  • कामगारांनी शिस्तपालन केले पाहिजे. चोरी, लांडी-लबाडी, अपहार, यंत्राची नासधूस करू नये.
  • मालक हा कामगारांचा शत्रू नसून उद्योगाच्या माध्यमातून नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणारा आपला सहकारी आहे ही विचारसरणी वाढीला लावणे.
  • ग्रॅच्युईटी, प्रॉव्हिडंट फंड, ई.एस.आय. इत्यादीबाबत कामगारांना मदत व सहकार्य.
  • अनावश्यक टाळेबंदी व संप यापासून कामगारांना योग्य ते संरक्षण.
  • कामगार आयुक्तालये व संबंधित यंत्रणा येथे कामगारांना योग्य ते मार्गदर्शन.
  • कामगार चळवळीतील झोटिंगशाही व प्रवृत्ती मोडून काढणे.
  • उद्योग चालविणे, दर्जेदार उत्पादन, शिस्त व शांततेच्या माध्यमातून उद्योग, कामगार व देशाची भरभराट.
  • अन्यायाचा प्रतिकार करताना आपण कोणावर अन्याय करीत नाही याविषयी दक्षता घेणे.
  • उद्योग, उत्पादन, कामगारविषयक कायदे याविषयी अभ्यास करून त्यात प्रगतीसाठी परिवर्तनाची प्रक्रिया सुचविणे.
  • देशाची प्रगती ही राष्ट्रीय उत्पन्न, वेतनमान, राहणीमान, शैक्षणिक, औद्योगिक प्रगती, अपघातांचे प्रमाण, आरोग्य सेवा यांच्याशी निगडित आहे.

भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदी दत्ताजी साळवी व सरचिटणीसपदी अरुण मेहता (जे पुढे कामगार मंत्री झाले) यांची नियुक्ती झाली. दादरला गोखले रोड, पुरंदरे वाडीत एका शेडमध्ये भारतीय कामगार सेनेचे कार्यालय उघडले. भारतीय कामगार  सेनेचा भगवा झेंडा प्रथम फडकला तो अंधेरी येथील आयर्न ब्रश कंपनीवर, त्याच्यापाठोपाठ एक्सेेल व टी. माणेकलाल या कारखान्यांत भारतीय कामगार  सेनेचा भगवा फडकला.

१९६९-७० च्या दरम्यान कांदिवली येथील महिन्द्र अॅण्ड महिन्द्र ट्रॅक्टर कंपनीतील कामगार व भांडूप येथील जी.के.डब्ल्यू.चे कामगार भारतीय कामगार  सेनेत दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ १०७०-७१ मध्ये लार्सन अॅण्ड टुब्रो पवई या इंजिनीअरिंग कंपनीतील कामगार बहुसंख्येने भारतीय कामगार  सेनेत दाखल झाले. त्यांच्या मागोमाग मरीन लाईन्स येथील मुंबई रुग्णालयामध्ये भगवा फडकला. यानंतर भारतीय कामगार  सेनेची लाटच कामगार विश्वात पसरली. कामगारहित, समाजहित व राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून कामगार प्रश्न सोडविणारी व औद्योगिक शांतता निर्माण करणारी युनियन म्हणजे भारतीय कामगार  सेना, हा लौकिक सर्वत्र पसरला.

सुरुवातीला दोन-चार वर्षे पाय रोवण्यात गेली. एकीकडे कम्युनिस्ट व दुसरीकडे काँग्रेस व समाजवादी कामगार संघटनांशी मुकाबला सुरू झाला. कम्युनिस्ट व इतर संघटनांचे सदस्य कारखान्याबाहेर शिवसैनिक व कारखान्यात लाल बावट्याचे सदस्य असे चित्र होते. शिवसेनाप्रमुखांनी ‘भूमिपुत्रांना नोकरी’ हे आंदोलन छेडताना शिवसैनिक कामगारांना कारखान्याच्या आतपण भगवा फडकविण्याचे आवाहन केले. याचा जादुई परिणाम झाला. भारतीय कामगार  सेनेकडे कामगारांचा ओघ लागला व कामगार वातावरण भगवेमय होऊन गेले. पुरंदरे वाडीतील जागा अपुरी पडू लागल्यामुळे १९७१ च्या सुरुवातीस भारतीय कामगार  सेनेचे कार्यालय ठाकूरद्वार येथे आले. शिवसेना नेते प्रमोद नवलकर यांच्या मध्यस्थीने ती जागा मिळाली. खालच्या मजल्यावर बी.ई.एस.टी. युनियनचे कार्यालय होते. ‘कामगार संघटना या कामगारांसाठी कामगारांनी चालविलेल्या असाव्यात’ हे सूत्र भारतीय कामगार  सेनेने तंतोतंत पाळले. भारतीय कामगार  सेनेचे पदाधिकारी हे कामगार वर्गातूनच आलेले आहेत.

भारतीय कामगार  सेनेने कामगारांना त्यांच्या मागण्या मिळवून दिल्याच शिवाय कामगारांत शिस्त निर्माण केली. बेशिस्त व कामचुकारांना प्रोत्साहन दिले नाही. उलट उत्पादन वाढीचे महत्त्व त्यांना समजावून दिले. इतर कंपनीतील कामगारांनी भारतीय कामगार  सेनेस येऊन मिळावे असा आक्रमक पवित्रा घेतला नाही. कामगारांत आपापसांत दुष्मनी नको हे सूत्र कायम ठेवले. फिल्डमध्ये काम करणाऱ्या चिटणीसांनी सेवा देण्यासाठी भारतीय कामगार  सेनेने पहिल्यापासून लक्ष पुरविले व चांगल्या स्टाफची नेमणूक केली. कामगार कायदेविषयक पुस्तकांची सोय केली. हळूहळू बदलत्या काळाप्रमाणे या प्रशासकीय कार्यालयात फेरबदल करून ते अद्ययावत संगणक व इतर आधुनिक सोयींनी सुसज्ज केले. जुने वकील निवृत्त झाल्यानंतर कामगारांची कोर्टातील प्रकरणे चालविण्यासाठी नव्या वकिलांची नेमणूक केली.

१९७७ साली शिवसेना भवनाची वास्तू बांधून पूर्ण झाली व ठाकूरद्वार येथील भारतीय कामगार  सेनेचे कार्यालय शिवसेना भवन येथे तिसऱ्या मजल्यावर आले. १९७९ मध्ये लाल बावट्याची युनियन काढून हॉटेल ओबेरॉय टॉवर्सच्या कामगारांनी हॉटेल ओबेरॉय टॉवर्सवर भगवा फडकवला. १९८५ च्या दरम्यान लोणावळा येथे ‘दत्ताजी साळवी स्वप्नपूर्ती कामगार भवन’ इमारतीचे उद्घाटन माननीय शिवसेनाप्रमुखांच्या हस्ते झाले. धडाकेबाज चिटणीसांमुळे अनेक कारखाने भारतीय कामगार  सेनेत दाखल झाले. विशेषत: विमानतळ परिसरातील व जुहू परिसरातील पंचतारांकित हॉटेल्स व कंबाटा एव्हिएशन, अंधेरीमधील महाविद्यालये, भारतीय आरोग्य निधी हॉस्पिटल वगैरे युनिट्स एकामागोमाग एक धडाक्यात दाखल झाली. तसेच पुण्यातील बजाज टेम्पो, बजाज ऑटो व औरंगाबादमधील बजाज ऑटो भारतीय कामगार  सेनेच्या भगव्या झेंड्याखाली आली व भारतीय कामगार  सेना मुंबईपुरतीच मर्यादित न राहता पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर वगैरे महाराष्ट्रातील औद्योगिक शहरात पसरली.

नवीन कंपन्या भारतीय कामगार  सेनेत दाखल होतच होत्या, त्यात कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचा खास उल्लेख करावा लागेल. तसेच काही महत्त्वाच्या कुरिअर आस्थापना उदा. पटेल ऑन बोर्ड कुरिअर, प्रोफेशनल कुरिअर, फर्स्ट फ्लाईट कुरिअर वगैरे कंपन्या भारतीय कामगार  सेनेत त्यांनी दाखल केल्या. जेट एअरवेज, दमानिया एअरवेज, शॅफेअर या कंपन्यांमध्ये त्यांनी भारतीय कामगार  सेनेची युनियन स्थापन केली.

१९९७ मध्ये एन.एस.ई. संकुल, गोरेगाव, मुंबई येथे भारतीय कामगार  सेनेच्या अखिल भारतीय पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन भरविण्यात आले. त्यात शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे, तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, सुभाष देसाई, सुरेश प्रभू वगैरेंनी मार्गदर्शन केले. संध्याकाळी माननीय शिवसेनाप्रमुखांच्या उपस्थितीत अधिवेशनाचा समारोप झाला.

राष्ट्रीय श्रम आयोग (वर्मा कमिशन)

१९९२ नंतर जागतिकीकरणाच्या धोरणामुळे कामगार संघटनांवर अतिशय प्रतिकूल परिणाम झाला. हजारो कारखाने बंद झाले. सगळीकडे व्ही.आर.एस.चे पेव फुटले. दि. १५.१०.१९९९ रोजी दुसरा राष्ट्रीय श्रम आयोग हा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात स्थापन झाला. या आयोगाने देशभरातील कामगार संघटनांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. या आयोगाने २००० साली मुंबईला भेट दिली होती. त्या वेळी परेल येथील कामगार कल्याण केंद्राच्या मुख्य कार्यालयात भारतीय कामगार  सेनेच्या शिष्टमंडळाने वर्मा आयोगाची भेट घेतली. कामगार कायद्यात सुधारणा, नफ्यात असलेले कारखाने बंद करण्याच्या आयोगांच्या शिफारशींना शिष्टमंडळाने विरोध केला. जागतिकीकरणातून निर्माण झालेल्या समस्यांचा व कामगारांपुढे असलेल्या आव्हानांचा विचार करण्यासाठी भारतीय कामगार  सेनेने पुढाकार घेऊन दि. ७ ऑगस्ट २००० रोजी षण्मुखानंद हॉलमध्ये मालक व सर्व राजकीय पक्षांच्या ट्रेड युनियनचे पदाधिकारी यांच्यामध्ये सुसंवाद घडवून आणला. या अधिवेशनाचे सूत्रसंचालन डॉ. ए.एस. ओबेरॉय, संचालक, आंतरराष्ट्रीय श्रम संस्था व डॉ. राजन मेहेरोत्रा, सदस्य, आंतरराष्ट्रीय श्रम संस्था नवी दिल्ली यांनी केले. पुढे मुंबईतील सर्व राजकीय पक्षांच्या कामगार संघटनांची वर्मा आयोगाला विरोध करण्यासाठी कृती समिती स्थापन झाली होती. त्यात भारतीय कामगार  सेनेच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना प्रणित सर्व कामगार संघटना सामील झाल्या होत्या. पण नंतर मतभेदामुळे शिवसेना प्रणित कामगार संघटना या कृती समितीतून बाहेर पडल्या व त्यांनी भारतीय कामगार  सेनेच्या नेतृत्वाखाली शिवसेना प्रणित कामगार संघटना कृती समितीची स्थापन केली. माननीय शिवसेना कार्यप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या कृती समितीने दि. २१ मार्च २००१ रोजी कामगारांचा प्रचंड मोर्चा आयोगाच्या विरोधात काढला. तसेच दि. ४ ऑक्टोबर २००१ रोजी माननीय शिवसेना कार्यप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना प्रणित सर्व कामगार संघटनांनी आयोगाच्या विरोधात कामगार मैदान, परळ, मुंबई येथे निषेध सभेचे आयोजन केले होते. या सभेनंतर कामगारांमध्ये आयोगाबद्दल एवढा प्रचंड असंतोष निर्माण झाला की कामगारांनी उत्स्फूर्तपणे वर्मा आयोगाच्या अहवालाच्या प्रतीचे जाहीर दहन केले.

कामगार सेनेची सेवाक्षेत्रावर पकड

शिवसेनाप्रमुख माननीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी २४ जुलै २००३ रोजी भारतीय कामगार  सेनेच्या अध्यक्षपदी शिवसेना उपनेते सूर्यकांत महाडिक यांची नियुक्ती केली. यानंतर अनेक युनिट्स भारतीय कामगार  सेनेत दाखल होऊन युनिट्सची संख्या वाढली. त्यात प्रामुख्याने ग्रॅन्ड हयात, हयात रिजेन्सी, ताज लॅन्ड्स एन्ड, जे. डब्ल्यू. मॅरिएट वगैरे हॉटेल्स भारतीय कामगार  सेनेत दाखल झाल्यामुळे मुंबईमधील पंचतारांकित हॉटेल्समधील बहुसंख्य कामगार भारतीय कामगार  सेनेचे सदस्य झाले. तसेच युनायटेड ब्रुअरीज, नाव्हाशेवा (जे.एन.पी.टी.), भक्तीवेदांत हॉस्पिटल येथील देखील बहुसंख्य कामगार भारतीय कामगार  सेनेचे सदस्य झाले.

शिवसेना भवन नूतनीकरण

शिवसेना भवनाच्या नूतनीकरणामुळे भारतीय कामगार सेनेचे कार्यालय मे २००४ मध्ये गोल्डन हाईट्स, हरिश्चंद्र माणिक पाटील मार्ग, दादर, मुंबई येथे स्थलांतरीत करण्यात आले. या कर्यालयाचे उद्घाटन माननीय शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केलेल्या ‘जय जवान! जय किसान!! जय कामगार!!!’ या घोषणेनंतर दि. २६ ऑगस्ट २००४ रोजी एन.एस.ई. संकुल, गोरेगाव, मुंबई येथे भारतीय कामगार  सेनेच्या कामगारांचा विराट मेळावा भरवण्यात आला. त्यात जवळजवळ देशभरातून २५००० कामगार हजर होते. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले. शिवसेना कार्यप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनीही या मेळाव्यात मार्गदर्शन केले.

बांधकाम व्यवसायातील समस्या

बांधकाम व्यवसायातील समस्या जाणून घेण्यासाठी संसदीय समितीने ६ नोव्हेंबर २००४ रोजी मुंबईला भेट दिली. भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष व राज्यसभेचे संसद सदस्य जना कृष्णमूर्ती हे या समितीचे अध्यक्ष होते. भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांची संसद समितीसमोर साक्ष झाली. सूर्यकांत महाडिक यांनी रस्त्याच्या नाक्यावर उभे असणारे स्वयंरोजगार कामगार जसे प्लंबर, पेंटर, फिटर, मजदूर यांचे युनियन ‘नाका कामगार युनिट’ म्हणून स्थापन करून नाका कामगारांना संघटित केले. बांधकाम व्यवसायाचे आजचे स्वरूप व स्वयंचलीत यंत्रणेचा मोठ्या प्रमाणावर वापर यामुळे मजुरांचे संख्याबळ बांधकामासाठी कमी लागते. या उद्योगात मोठ्या प्रमाणात मसल पॉवरचा वापर होतो.

मूळ मालकाचे जिथे काम असेल, त्या ठिकाणी ते काम चालू असेल व मूळ मालकाचे दुसऱ्याच ठिकाणचे काम संपले असेल तर दुसऱ्या ठिकाणच्या कामगारांना जिथे काम चालू असेल तिथे सामावून घेणे शक्य नसते. त्यामुळे या कामगारांना तात्पुरते बेकारी अवस्थेत घालवावे लागतात. या अवस्थेत त्यांना ५०% वेतन मिळण्याची व्यवस्था व्हावी. या कामात धोके व जोखीम खूप असते. अपघात होतात. सुरक्षिततेचे नियम मालकवर्ग पाळत नाहीत. त्यासाठी काही कायदे करावेत.

  • वैद्यकीय मदतीची व्यवस्था होणे.
  • त्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळणे.
  • जे अपंग होतात, त्यांना पेन्शन मिळणे.
  • या सर्व गोष्टींसाठी एक व्यवस्था निर्माण करणे.

या उद्योगात महिलांची संख्या मोठया प्रमाणावर असते. त्यांना संरक्षण तर मिळालेच पाहिजे, पण वेतनातील असमानता दूर झाली पहिजे. प्रसूतीचे फायदे कायद्यानुसार मिळाले पाहिजेत. या महिलांना स्थिरता नसल्यामुळे त्यांच्या कौटुंबिक जीवनावर परिणाम होतो. या उद्योगात बालकामगार पण नोकरीवर असतात. या उद्योगात वेठबिगारीची पद्धत आढळून येते. ही पिढ्यानपिढ्या चालू असते ती या बालकामगारांमुळेच. ते नोंद करण्यात यावे व त्यांच्या शिक्षणाची सोय सरकारने करावी. सर्व कामगारांना सामाजिक सुरक्षिततेचे फायदे देण्यासाठी असलेल्या अडचणी दूर करून ई.एस.आय., पी.एफ., पेन्शन वगैरे देण्यासाठी एखादे मंडळ तयार करावे व त्याद्वारे वरील फायदे त्यांना देण्यात यावेत. या उद्योगातील सर्व कामगारांना विमा योजना लागू करावी.

भारतीय कामगार  सेनेच्या व्यवस्थापनाखाली स्व. सौ. मीनाताई ठाकरे स्मृती स्मारक समितीची स्थापना झाली. या समितीतर्फे समाजसेवेशी निगडित उपक्रम राबविले जातात. या समितीतर्फे सन २००३ पासून समाजातील सेवाभावी महिलेला ‘ममता पुरस्कार’ देण्यात येतो. प्रथम ‘ममता पुरस्कार’ साधनाताई बाबा आमटे यांना देण्यात आला व ‘ममता पुरस्कार-२००५’ श्रीमती वेणूताई मेघवाले व श्रीमती प्रेमाताई पुरव यांना विभागून देण्यात आला. या समितीने मराठे उद्योग भवनच्या मागे, स्टॅन्डर्ड मिल, प्रभादेवी येथे एक जागा घेतली आहे. या समितीतर्फे गरजू व गरीब महिलांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्याचा मानस आहे.

मॅटर्निटी बेनिफीट (दुरुस्ती) विधेयक २००७

दि. ३ जुलै २००७ रोजी संसदीय स्टँडिंग लेबर कमिटीची बैठक पार्लमेंट ऍनेक्स इमारत, संसद मार्ग, नवी दिल्ली येथे झाली. आंध्र प्रदेश राज्यसभेचे सदस्य रेड्डी हे समितीचे अध्यक्ष होते. या बैठकीला केंद्रीय कामगारांच्या राजकीय संघटना आयटक (साम्यवादी), सीटू, इंटक, सीटीएम, हिंद मजदूर सभा, बीएमएस (भाजप) व शिवसेनेतर्फे भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक, उपाध्यक्ष अजित साळवी, भारतीय कामगार  सेना महासंघाचे चिटणीस एस. एल. कौशिक हजर होते.
आयटक प्रतिनिधी श्रीमती अमरजीत कौर यांनी मेडिकल बोनसची रु. १०००/- रक्कम अपुरी आहे असे सांगून या कायद्यातील इतरही तरतुदींवर भाष्य केले. त्यानंतर सीटू, इंटक, सीटीएम, हिंद मजदूर सभा, बीएमएस यांच्या प्रतिनिधींची भाषणे झाली. त्यांनी पण मर्यादा रक्कम रु. ५०००/- पर्यंत वाढवावी व ही रक्कम इंडेक्सला जोडण्यात यावी. कमिटीने एक प्रश्नावली प्रतिनिधींना वाटली व दि. १५ जुलैपर्यंत ती भरून आमच्याकडे पाठवा असे निवेदन केले. त्याचप्रमाणे प्रश्नावली भरून पाठवली.

डेन्मार्क कमिटी

३ मार्च २००९ रोजी भारतीय कामगारांना परदेशात मजदूर म्हणून काम करत असताना काय अडचणी येतात, याचा सांगोपांग विचार करण्यासाठी डेन्मार्कच्या संसद शिष्टमंडळाने मुंबईला भेट दिली. लार्सन अॅन्ड टुब्रोचे एचआर हेड डी.सी. मंडलिक यांनी हॉटेल ताजमहालमध्ये भारतीय कामगार सेना पदाधिकार्‍यांसमवेत एक संवाद आयोजित केला. या संवादात परदेशात नोकऱ्या करणाऱ्या कामगारांची सामाजिक सुरक्षितता, पगाराच्या बचतीचे भारतात हस्तांतरण, कामगारांची भरती दूतावासातर्फे असावी की शासनातर्फे असावी, नोकरीची सुरक्षितता, कामाचा परवाना, शिस्तभंगाची प्रकरणे, कामगारांच्या कुटुंबातील सदस्यांना परदेशात नोकरीसाठी काय वाव आहे, डेन्मार्कला कुठल्या कुशल कामगारांची जरुरी आहे, धर्मविषयक स्वातंत्र्य या विषयावर संसद सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सूर्यकांत महाडिक यांनी चोख उत्तरे दिली. तसेच कामगार सेना दहशतवादाचा अवलंब करते असा सूर एका संसद सदस्याने लावला होता, तो सूर्यकांत महाडिक यांनी खोडून काढला. २६/११/०८ ला हॉटेल ताज व ओबेरॉयवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात भारतीय कामगार सेनेच्या सदस्य कामगारांनी काही निष्पाप लोकांचे प्राण वाचवल्याचे उदाहरण दिले.

कामगार प्रशिक्षण वर्ग

कामगारांना प्रशिक्षित करण्यासाठी भारतीय कामगार सेना कामगार शिक्षणाचे वर्ग भरवीत असते. याद्वारे आजपर्यंत हजारो कामगार प्रशिक्षित झाले आहेत. कामगार चळवळीत यापुढे कसोटी आहे ती निर्धाराची, प्राप्त परिस्थितीला सामोरे जाण्याची, शिवसेनाप्रमुखांनी आखून दिलेल्या मार्गावरून विचलीत न होता निर्भीडपणे पुढे जाण्याची. मक्तेदारी संपून स्पर्धेला सामोरे जाताना अनोळखी मार्गाची व अदृश्य शक्तींची निर्मिती करणारी साधने उपलब्ध होतील व बुद्धीला चालना मिळेल यात संदेह नाही. पोथीनिष्ठ विचारसरणी नसल्यामुळे केवळ ज्वलंत राष्ट्रवाद स्वीकारून परिस्थितीला सामोरे जाण्याचे धाडस शिवसेनाप्रमुखांनी सातत्याने दाखविले. ते दीपस्तंभासारखे आजही मार्ग दाखवीत आपले व देशाचे नेतृत्व करीत आहेत. कामगार चळवळ हे सेवेचे माध्यम आहे व शोषितांना दिलासा देणारी शक्ती आहे.

५० वर्षानंतर विचारसरणी बदलली, दिशाही बदलल्या, आता कृतीत बदल अपेक्षित आहे. श्रमांची पूजा करून प्रतिष्ठा वाढविली तर संभाव्य परिस्थितीला आपण यशस्वीपणे सामोरे जाऊ शकू. संगणकाचे आव्हान, नवीन तंत्रज्ञानाची द्वारे खुली झाली आहेत. मनुष्यबळापेक्षा तंत्र बलवान होत आहे. ते मंत्र आत्मसात करून आपण कोणत्याही क्षेत्रात कमी पडणार नाही हे सिद्ध करायला पुढे पाऊल टाकून मार्गक्रमण करायला सुरुवात करू. मा. शिवसेनाप्रमुखांचे प्रगल्भ विचार आणि मार्गदर्शन आपल्या पाठीशी आहेच. देशातील कामगार चळवळ बलवान करण्याची आज सुवर्णसंधी आहे. रंजले-गांजलेल्या असंघटितांना संघटित करून दिलासा देणे हीच खरी आजची गरज आहे. भगव्या विचारांनी एकत्रित झालेल्या राष्ट्रवादी शक्तींनी तिची पूर्तता करावी.