भारतीय कामगार सेना : वाटचाल

९ ऑगस्ट १९६८ रोजी नरेपार्क मैदानावरील सभेत शिवसेना प्रमुख माननीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने उपस्थित कामगार विश्‍वातील एका वेगळ्या तत्वन्यानाच्या श्‍वासाने भरलेली पहिली मराठमोळी तुतारू फुंकली गेली आणि मुंबईच्या हिंदुस्थानाच्या कामगार चळवळीत भारतीय कामगार सेना नामक एक बलाढ्य देशप्रेमी कामगार संघटनेचा जन्म झाला. शिवसेनेचे कामगार धोरण व शिवसेना प्रमुखांची मुख्य शिकवण या विचारावर आधारीत टीप्पणी सोबत जोडली आहे. भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदी कै. श्री. दत्ताजी साळवी व सरचिटणीसपदी कै. श्री. अरुण मेहता जे पुढे कामगार मंत्री झाले, यांची नियुक्ती झाली. त्यावेळेस श्री जोशी हे कार्यालय प्रमुख म्हणून काम पहात होते. दादरला गोखले रोड, पुरंदरे वाडीत एका शेडमध्ये भारतीय कामगार सेनेचे कार्यालय उघडले. भारतीय कामगार सेनेचा भगवा झेंडा प्रथम फडकला तो अंधेरी येथील आर्यन ब्रश कंपनीवर, त्याच्या पाठोपाठ एक्सेल व टी. माणेकलाल या कारखान्यात भारतीय कामगार सेनेचा भगवा फडकला. सुरवातीला दोन चार वर्षे पाय रोवण्यात गेली. एकीकडे कम्युनिस्ट व इतर संघटनांचे सदस्य कारखान्याबाहेर, शिवसैनिक व कारखान्यात लाल बावट्याचे सदस्य असे चित्र होते. शिवसेना प्रमुखांनी भुमीपुत्रांना नोकरी हे आंदोलन छेडताना, शिवसैनिक कामगारांना कारखान्याच्या आत पण भगवा फडकविण्याचे आवाहन केले. याचा जादुई परिणाम झाला. भारतीय कामगार सेनेकडे कामगारांचा ओघ लागला सेन्ट्रल वेस्टर्न रेल्वे लाईनला लागून असलेल्या बहुतांशी कारखान्यांवर भगवा फडकू लागला व कामगार वातावरण भगवेमय होऊन गेले. पुरंदरे वाडीतील जागा अपुरी पडू लागल्यामुळे १९७१ च्या सुरवातीस भारतीय कामगार सेनेचे कार्यालय ठाकुरद्वार येथे आले. शिवसेनानेते श्री. प्रमोद नवलकर यांच्या मध्यस्थीने ती जागा मिळाली. खालच्या मजल्यावर बी.ई.एस.टी. युनियनचे कर्यालय होते. ‘कामगार संघटना या कामगारांसाठी कामगारांनी चालविलेल्या असाव्यात’ हे सूत्र भारतीय कामगार सेनेने तंतोतंत पाळले. भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी हे कामगार वर्गातूनच आलेले आहेत.

१९६९-७० च्या दरम्यान कांदिवली येथील महिन्द्र ऍण्ड महिन्द्र ट्रॅक्टर कंपनीतील कामगार व भांडूप येथील जी.के.डब्ल्यू. चे कामगार भारतीय कामगार सेनेत दाखल झाले. त्याच्या मागोमाग मरीन लाईन्स येथील मुंबई रुग्णालयामध्ये भगवा फडकला. यानंतर भारतीय कामगार सेनेची लाटच कामगार विश्‍वात पसरली. कामगार हित, समाज हित व राष्ट्र हित डोळ्यासमोर ठेवून कामगार प्रश्‍न सोडविणारी व औद्योगिक शांतता निर्माण करणारी युनियन म्हणजे भारतीय कामगार सेना, हा लौकिक सर्वत्र पसरला. १९७२-७३ मध्ये श्री. कृष्णकांत कोंडलेकर भारतीय कामगार सेनेत दाखल झाले. भारतीय कामगार सेनेने कामगारांना त्यांच्या मागण्या मिळवून दिल्याच, शिवाय कामगारांत शिस्त निर्माण केली. बेशिस्त व कामचुकारांना प्रोत्साहन दिले नाही. उलट उत्पादन वाढीचे महत्व त्यांना समजावून दिले. इतर कंपनीतील कामगारांनी भारतीय कामगार सेनेस येऊन मिळावे असा आक्रमक पवित्रा घेतला नाही. कामगारात आपापसात दुष्मनी नको हे सूत्र कायम ठेवले. १९७५-७६ मध्ये सर्वश्री दिनानाथ गंद्रे, वसंत बावकर, अजित साळवी हे पदाधिकारी होते. कामगार आयुक्तांसंबंधी सर्व पत्रव्यवहार अजित साळवी पहात होते. श्री देवदत्त रेगे व नरेंद्र मोरे हे पण चिटणीस म्हणून काही काळ होते. १९७७ साली शिवसेना भवनाची वास्तू बांधून पूर्ण झाली व ठाकुरद्वार येथील भारतीय कामगार सेनेचे कार्यालय शिवसेना भवन येथे तिसऱ्या मजल्यावर आले. १९७९ मध्ये लाल बावट्याची युनियन काढून हॉटेल ओबेरॉय टॉवर्सच्या कामगारांनी हॉटेल ओबेरॉय टॉवर्सवर भगवा फडकवला. १९७५ ते १९८४ पर्यंत सरचिटणीस श्री. दत्ता सावंत यांचा कार्यकाल होता. याच काळात श्री. वसंतराव साळवी, कै. दत्ताजी साळवी यांचे बंधू हे पण चिटणीस म्हणून भारतीय कामगार सेनेत दाखल झाले. १९८४ साली श्री. रमाकांत मोरे यांची सरचिटणीसपदी नियुक्ती झाली.

१९८५ च्या दरम्यान लोणावळा येथे दत्ताजी साळवी स्वप्‍नपूर्ती कामगार भवन इमारतीचे उद्‍घाटन माननीय शिवसेनाप्रमुखांच्या हस्ते झाले. कामगारांना प्रशिक्षित करण्यासाठी उपाध्यक्ष श्री. देवराम भोसले व चिटणीस श्री. अल्बर्ट पिंटो कामगार शिक्षणाचे वर्ग भरवित असताना. याद्वारे हजारो कामगार प्रशिक्षित झाले आहेत.

१९९१ मध्ये श्री. अल्बर्ट पिंटो व श्री. शंकर मोरे हे चिटणीसपदी रुजू झाले. १९९२ मध्ये श्री. रमेश मोरे यांची हत्या होवून त्यांचे अकाली निधन झाले. कामगारांसाठी त्यांनी हौतात्म्य पत्करले असे म्हणणे योग्य ठरेल. त्यांच्या निधनानंतर भारतीय कामगार सेनेची पुर्वरचना झाली. त्यावेळी सर्वश्री गुरूनाथ खोत, अरुण तोरस्कर, प्रकाश नाईक, आप्पा खानविलकर इ. सर्वांची चिटणीसपदी नेमणूक झाली. या फेररचनेमुळे ज्या नविन कंपन्या भारतीय कामगार सेनेत दाखल झाल्या, त्यात कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचा खास उल्लेख करावा लागेल. तसेच काही महत्वाच्या कुरिअर आस्थापनात उदा. पटेल ऑन बोर्ड कुरिअर, फर्स्ट फ्लाईट कुरिअर वैगरे कंपन्या भारतीय कामगार सेनेत त्यांनी दाखल केल्या. जेट एअरवेज, दालमिया एअरवेज व शैफेअर या कंपन्यांमध्ये पावसकर यांनी भारतीय कामगार सेनेची युनियन स्थापन केली.

१९९४-९५ मध्ये अध्यक्ष श्री. दत्ताजी साळवी हे निवृत्त झाले व श्री. रमाकांत मोरे यांची अध्यक्षपदी व श्री. कृष्णकांत कोंडलेकर यांची सरचिटणीसपदी नेमणूक झाली.

१९९२ नंतर जागतिकीकरणाच्या धोरणामुळे कामगार संघटनांवर अतिशय प्रतिकुल परिणाम झाला. हजारो कारखाने बंद झाले. सगळीकडे व्ही.आर.एस. चे पेव फुटले. दि. १५-१०-१९९९ रोजी दुसरा राष्ट्रीय श्रम आयोग हा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात स्थापन झाला. या आयोगाने देशभरातील कामगार संघटनांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. या आयोगाने २००० साली मुंबईला भेट दिली होती, त्यावेळी परेल येथील कामगार कल्याण केंद्राच्या मुख्य कार्यालयात अध्यक्ष श्री. रमाकांत मोरे व सरचिटणीस श्री. कृष्णकांत कोंडलेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कामगार सेनेचे जे शिष्टमंडळ गेले त्यात सर्वश्री देवराम भोसले, अजीत साळवी, अल्बर्ट पिंटो, अरुण तोरस्कर, सुरेश डोंगरे यांचा समावेश होता. त्यांनी वर्मा आयोगाची भेट घेतली. कामगार कायद्यात सुधारणा, नफ्यात असलेले कारखाने बंद करण्याच्या आयोगाच्या शिफारशींना शिष्टमंडळाने विरोध केला. जागतिकीकरणातून निर्माण झालेल्या समस्यांचा व कामगारांपुढे असलेल्या आव्हानांचा विचार करण्यासाठी भारतीय कामगार सेनेने पुढाकार घेऊन दि. ७ ऑगस्ट २००० रोजी षण्मुखानंद हॉल मध्ये मालक सर्व राजकीय पक्षांच्या ट्रेड युनियनचे पदाधिकारी यांच्यामध्ये सुसंवाद घडवून आणला. या अधिवेशनाचे सूत्रसंचालन डॉ. ए. एस. ओबेरॉय, संचालक, आंतरराष्ट्रीय श्रम संस्था व डॉ. राजन मेहेरोत्रा, सदस्य, आंतरराष्ट्रीय श्रम संस्था, नवी दिल्ली यांनी केले. पुढे मुंबईतील सर्व राजकीय पक्षांच्या कामगार संघटनांची वर्मा आयोगाला विरोध करण्यासाठी कृती समिती स्थापन झाली होती. त्यात भारतीय कामगार सेनेच्या नेतृत्वाखली एक शिवसेनाप्रणित सर्व कामगार संघटनांनी कृती समिती स्थापन केली. मानानीय शिवसेनाप्रणित सर्व कामगार संघटनांनी आयोगाच्या विरोधात कामगार मैदान, परळ, मुंबई येथे निषेध सभेचे आयोजन केले होते. या सभेला सन्माननीय श्री. मधुकर सरपोतदार, सूर्यकांत महाडिक, रमाकांत मोरे वगैरेंनी मार्गदर्शन केले. या सभेनंतर कामगारांमध्ये आयोगाबद्दल एवढा प्रचंड असंतोष निर्माण झाला की कामगारांनी उत्स्फूर्तपणे वर्मा आयोगाच्या अहवालाच्या प्रतिचे जाहीर दहन केले.

२४ जुलै २००३ रोजी अध्यक्ष श्री. रमाकांत मोरे व सरचिटणीस श्री. कृष्णकांत कोंडलेकर हे निवृत्त झाले व त्यांच्या जागी शिवसेना उपनेते श्री. सूर्यकांत महाडिक अध्यक्ष यांची शिवसेनाप्रमुख माननीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी नियुक्ती केली. या दोघांच्या कार्य शैलीने भारतीय कामगार सेनेत नवे चैतन्य निर्माण झाले. शिवसेना व भारतीय कामगार सेना यांच्यातील सुसंवाद वाढला. अनेक नविन युनिट्स भारतीय कामगार सेनेत दाखल होवून युनिटसची संख्या वाढली. त्यात प्रामुख्याने ग्रॅण्ड हयात, हयात रिजेन्सी, ताज लॅण्डस एन्ड, जे.डब्लू. मॅरिएट वगैरे हॉटेल्स भारतीय कामगार सेनेत दाखल झाल्यामुळे मुंबई मधील पंचतारांकीत हॉटेल्स मधील बहुसंख्य कामगार भारतीय कामगार सेनेचे सदस्य झाले आहेत. ही बाब उल्लेखनीय आहे.

शिवसेना भवनाच्या नुतनीकरणामुळे भारतीय कामगार सेनेचे कार्यालय मे २००४ मध्ये गोल्डन हाईट्स, हरिचंद्र माणिक पाटील मार्ग, दादर, मुंबई येथे स्थलांतरीत करण्यात आले. भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी अखिल भारतीय किर्तीचे ट्रेड युनियन तन्य नव्हते पण शिवसेना प्रमुखांनी घालून दिलेल्या तत्वन्यानाशी प्रामाणिक होते व या सच्‍च्या पदाधिकाऱ्यांच्या जोरावर इतर पक्षांच्या अखिल भारतीय कामगार संघटनांना टक्‍कर देवून अनेक कंपन्यांचा डोलारा उभारू शकतात व सांभाळू शकतात. ही कामगारांनी भारतीय कामगार सेनेला दिलेल्या यशस्वी वाटचालीची पावतीच आहे.

शिवसेनाप्रमुख माननीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी जाहिर केलेल्या ‘जय जवान ! जय किसान !! जय कामगार !!!’ या घोषणेनंतर दि. २६ ऑगस्ट २००४ रोजी एन. एस. ई. संकुल, गोरेगाव मुंबई येथे भारतीय कामगार सेनेच्या कामगारांचा विराट मेळावा भरवण्यात आला. त्यात जवळजवळ देशभरातून २५००० कामगार हजर होते. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शन शिवसेनाप्रमुख माननीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी केले. माननीय शिवसेना कार्याध्यक्ष श्री. उद्धवजी ठाकरे यांनी या मेळाव्यात मार्गदर्शन केले. सर्वश्री सुभाष देसाई, मधुकर सरपोतदार, सूर्यकांत महाडिक यांनी या मेळाव्याला संबोधीत केले.

भारतीय कामगार सेनेच्या व्यवस्थापनाखाली स्व. सौ. मिनाताई ठाकरे स्मृती, स्मारक समितीची स्थापना झाली. या समितीतर्फे समाजसेवेशी निगडीत उपक्रम राबविले जातात. या समितीतर्फे सन २००३ पासून समाजातील सेवाभावी महिलेला ‘ममता पुरस्कार’ देण्यात येत आहे. प्रथम ‘ममता पुरस्कार’ साधनाताई बाबा आमटे यांना देण्यात आला.

7 फेब्रुवारी 2021 रोजी भारतीय कामगार सेना अध्यक्षपदी आदरणीय शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली. अरविंद सावंत हे गेली ३५ वर्षे ते युनियन क्षेत्रात काम करत आहेत. सावंत यांनी ३ दशकं महानगर टेलिफोन निगम लिमिटेडचं नेतृत्त्व केलं आहे. त्यांना कामगार, कामगार मंत्रालय, केंद्राची कामगार धोरणे याबद्दलचा दीर्घ अनुभव देखील आहे. त्यामुळेच भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. शिवसेना उपनेते आणि माजी आमदार सूर्यकांत महाडिक यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती.

दरम्यान, ही नियुक्ती झाल्यावर अरविंद सावंत म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेल्या कामगार कल्याणासाठी मी काम करत राहीन. तसेच शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याबद्दल जो विश्वास दाखवला त्याला खरे उतरण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. मराठी कामगारांना न्याय मिळवून देतानाच जास्तीत जास्त मराठी माणसाला रोजगार कसा प्राप्त होईल, यासाठीही मी प्रयत्न करीन.

शिवसेना  पक्ष नेहमीच कामगारांच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेताना दिसून येतो. सध्या देशभरात कामगारांमध्ये अस्वस्थता आहे अश्या वेळी सावंत यांच्यासारखा खंबीर अभ्यासु नेतृत्व जर या कामगारांच्या संघटनेचे नेतृत्व करणार असेल तर एकप्रकारचा जोश  सदस्यांमध्ये येईल याची खात्री तसेच प्रदीर्घ अनुभव, निष्ठा आणि पक्षासाठी केलेला त्याग लक्षात घेवून उद्धवसाहेब ठाकरेंनी अरविंद सावंत यांनी भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी अरविंद सावंत यांच्या खांद्यावर दिली आणि त्यांनी ती लिलया पेलली हेच गत 4  वर्षांच्या कालावधीत स्पष्ट झाले.