शिवसेनेची निर्मिती
१९ जून १९६६
`मार्मिक’मधून मुंबईतील आस्थापनांतील नोकरवर्गाच्या याद्या छापून येत होत्या त्या परप्रांतीयांच्या होत्या. मराठी माणसास स्थान नव्हते. लायकी असून त्यांना नोकऱ्या मिळत नव्हत्या. मुंबईतील सरकारी-निमसरकारी व प्रायव्हेट कंपन्यांमध्ये दाक्षिणात्यांचा भरणा जास्त होता. मराठी माणूस शोधून सापडत नव्हता. `मार्मिक’मधील आपल्या लिखाणाने बाळासाहेबांनी मराठी माणसाचे स्फुल्लिंग चेतवले. अनेक मराठी माणसे `मार्मिक’च्या कार्यालयात येऊन आपल्या व्यथा आणि वेदना मांडायचे. ही मराठी माणसांची गर्दी पाहून दादा म्हणाले, हे एवढे लोक येतात, याला काही ऑर्गनाईज्ड स्वरूप द्यायचं की नाही? या सगळ्या गोष्टीला, चळवळीला संघटनेचा आकार द्या. तरच त्यातून काहीतरी ठोस घडेल. नाहीतर ही जागृती फुकट जाईल. मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी प्राणपणाने झुंजणारी संघटना काढणं हा एकच मार्ग त्यावर आहे. संघटना काढायची! दादा म्हणाले, `कधी?’
बाळासाहेब म्हणाले, `आता.’ नारळ आणून छत्रपतींच्या पुतळ्यासमोर सहदेव नाईकने तो फोडला. बाळासाहेब म्हणाले, `नाव काय ठेवायचे?’
दादा म्हणाले, `त्यात विचार कसला करता? शिवसेना.’
तो दिवस होता १९ जून १९६६.
मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी `शिवसेना’ स्थापन झाली.
१९ जून १९६६ रोजी सकाळी ९.१५ वाजता शिवछत्रपतींच्या जयजयकारात शिवसेनेची नोंदणी सुरू झाली. श्री. सहदेव नाईक यांनी जयजयकार करून नारळ फोडला व प्रबोधनकारांच्या हस्ते शिवसेनेचे तक्ते देण्यास सुरुवात झाली. एकदा तासात दोन हजार तक्ते संपले. दोन दिवसांत दहा हजारांच्यावर नोंदणी झाली. २६ जूनच्या `मार्मिक’मध्ये शिवसेनेचे बोधचिन्ह म्हणून डरकाळ्या फोडणारा `वाघ’ छापण्यात आला. सोबत शिवराय होतेच. मागच्या बाजूला महाराष्ट्राचे चित्र आणि `मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ हे वचन लिहिले होते आणि मोठ्या अक्षरात मराठी माणसाच्या या संघटनेचे नाव छापले होते – `शिवसेना’!
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे ह्यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांकरिता लढण्यासाठी आणि त्यांची एकजूट करण्यासाठी शिवसेनेची स्थापना केली. शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून उपरोक्त प्रसंगान्वये १९ जुन १९६६ या दिवशी बाळासाहेबांनी त्यांचे कुटुंबीय आणि काही सहकाऱ्यांबरोबर कदम मॅन्शनच्या व्हरांड्यामधे शिवसेनेची स्थापना केली. ह्या संघटनेने मरगळलेल्या मराठी मनांना जागृती आणि स्फूर्ती दिली.शिवसेनेच्या स्थापनेची बातमी वणव्याप्रमाणे सर्वदूर पसरली. १९ जुलैच्या सकाळी बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे संघटनेच्या सदस्यत्वाचे अर्ज वाटप करण्याच्या मोहीमेवर स्वतः बाहेर पडले होते. शिवसेना हा शब्दच जोश, तेज आणि न्याय्य हक्कांसाठी लढण्याची चेतना ह्यांना समानार्थी झाला.विसाव्या शतकातील सत्तरांवे दशक शिवसेनेसाठी अतिशय वैभवशाली दशक ठरले ; कारण मराठी माणसाच्या हक्कांसाठीचा लढा आणि मराठी माणसाच्या प्रगतीसाठी ह्या काळात अथक परिश्रम घेतले गेले.
बाळासाहेबांचे अग्रलेख अतिशय सडेतोड, बेधडक आणि परखड टीका करणारे असत .त्यांनी काढलेली मार्मिक व्यंगचित्रे आणि मर्मभेद करणारे लेख प्रत्येकाकडून अतिशय उत्सुकतेने वाचले जात.मराठी तरुणांवर झालेल्या अन्यायाला, त्यांच्या दबलेल्या भावनांना वाचा फोडून मोकळी वाट करुन देण्याचे काम ती व्यंगचित्रे आणि लेख करीत होते.अशा परिस्थितीत मराठी तरुणांना बाळासाहेबांच्या रुपाने आशेचा किरण आणि वडीलधाऱ्याचा आधार मिळाला.बाळासाहेब तरुणांचे मित्र,तत्वज्ञ आणि मार्गदर्शक बनले.शिवसेना अत्यंत शीघ्रगतीने मुंबई आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरू लागली.
शिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ मध्ये झाली, पण एक राजकीय पक्ष म्हणून साकार होण्यासाठी शिवसेनेला तब्बल २२ वर्षांचा मोठा काळ लागला.भारतीय निवडणूक आयोगाच्या पूर्वशर्तींची पूर्तता न केल्यामुळे शिवसेनेकडे स्वतःचे अधिकृत चिन्ह नव्हते. १९८८ मधे भारतीय निवडणूक आयोगाने सगळ्या राजकीय पक्षांची नोंदणी करण्याचा निर्णय घेतला.निवडणूक आयोगाने घटना दुरुस्तीनुसार धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाही ह्या तीन घटकांचा राजकीय पक्षाच्या घटनेमधे समावेश करणे अनिवार्य केले.शिवसेना प्रमुखांनी ही जवाबदारी श्री. सुभाष देसाई ह्यांच्यावर सोपवली आणि त्यांनी ती यशस्वीरीत्या पूर्ण केली.
१९८९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे चार आमदार निवडून आले होते .जिंकलेल्या जागा आणि त्यांना मिळालेल्या मतांच्या संख्येमुळे शिवसेनेला अधिकृतपणे ‘धनुष्यबाण’हे चिन्ह मिळाले.निवडणूक आयोगाच्या चुकांमुळे शिवसेनेच्या अधिकाऱ्यांना चिन्ह मिळविण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले.आयोगाने वामनराव महाडीकांना स्वतंत्र उमेदवार आहेत असे घोषीत केले होते, ह्याचा परिणाम असा झाला की मिळालेल्या मतांची टक्केवारी आवश्यक तेवढी भरली नाही.पण पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने निवडून आलेले चारही आमदार शिवसेनेचेच आहेत असे मान्य केले गेले आणि त्यांनी मिळवलेल्या मतांची टक्केवारी लक्षात घेऊन शिवसेनेला स्वतंत्र अधिकृत चिन्ह मिळाले.


